जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२६ । जळगाव– छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पाळधी (ता. जामनेर) नजीक भीषण अपघात झाला. भरधाव वाहनाच्या धडकेत एकाच जागीच मृत्यू, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. उत्तम परदेशी (५४), असे अपघातातील मृताचे नाव असून या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्तारोको आंदोलन केल्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गाव महामार्गाला लागूनच असल्याने या ठिकाणी वाहने नेहमीच सुसाट असतात. आज दुपारी एका भरधाव वाहनाचा अचानक ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात उत्तम परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातानंतर पाळधीतील ग्रामस्थांचा संयम सुटला असून, संतप्त नागरिकांनी महामार्गावर ‘रास्तारोको’ आंदोलन केलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी पहिली मागणी केली आहे. तसेच जखमींवर सुरू असलेल्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी दुसरी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

याशिवाय पाळधी परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने त्वरित गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसवावेत, जेणेकरून वाहनांचा वेग नियंत्रित राहील, अशी मागणी करण्यात आली आहे. चौथी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे महामार्गालगत वाढलेली सर्व अतिक्रमणे २४ तासांच्या आत हटवावीत. अपघातप्रवण ठरत चाललेल्या या भागात भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.








