नाशिराबाद पोलिसांची धडक कारवाई; फरार आरोपी अटक, हद्दपार, अवैध व्यवसायांवर कडक कारवाई

फेब्रुवारी 9, 2026 6:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिराबाद पोलीस स्टेशन, कडील हद्दीत दिनांक २७ डिसेंबर २०२५ ते आजपर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. या कालावधीत गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध प्रकारच्या कारवाया करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

crime 2 jpg webp

फरार आरोपींना अटक :
नाशिराबाद पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील गेल्या ०८ महिन्यांपासून फरार असलेल्या ०३ आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. तसेच पीटा कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन महिण्यापासून फरार असलेल्या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

हद्दपार कारवाई :
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार ०५ आरोपींना जळगांव जिल्ह्यातून ०१ वर्षाकरीता हद्दपार केल्याचे आदेश झाल्याने त्यांना जळगाव जिल्हा हद्दीतुन मोताळा, जि. बुलढाणा येथे घालवुन देण्यात आले आहे.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत यश :
मिसिंग व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत सन २०१८ पासून बेपत्ता असलेल्या महिला व पुरुषांचा शोध घेत एकूण ०५ मिसिंग व्यक्तींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तसेच अपहरण प्रकरणातील एका अल्पवयीन मुलाचाही शोध घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

गोमांस बाळगणाऱ्यांवर कारवाई :
गुप्त माहितीच्या आधारे अवैध कत्तल व गोमांस विक्रीप्रकरणी छापा टाकून सुमारे २२,००० रुपये किमतीचे गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणात ०२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई :
गस्तीदरम्यान गोदावरी हॉस्पीटल समोरील उड्डाणपुलावर अवैध रित्या वाळू चोरी व वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली. यामध्ये डंपरसह अंदाजे ३,६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल आहे.

दारूबंदी कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत देशी व विदेशी दारू जप्त करून एकूण ०६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत २३,५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सट्टा जुगारावर धडक :
अवैध सट्टा जुगार चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करत ०१ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नाशिराबाद पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आगामी काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now