जळगाव लाईव्ह न्यूज । गिरणा नदीवरील कांताई बंधारा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या जळगावच्या तरुणाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आशुतोष दिलीपकुमार जोशी (२२, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) असं मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आशुतोष याचे आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजीने त्याचा सांभाळ केला होता. मिळालेल्या माहितीनुसार आशुतोषसह सागर जयराम कटारिया (२२), सोमय्या राजेश जैस्वाल (१६), राहुल चव्हाण (१६, सर्व रा. गणेश नगर, जळगाव) हे चार मित्र कांताई बंधारावर फिरण्यासाठी आले होते. ते बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला गिरणा नदीत हातपाय धुण्यासाठी उतरले असता त्यापैकी दोन जण पाय घसरून पाण्यात पडले. तेथे उपस्थित मासेमार व स्थानिक तरुणांनी तातडीने धाव घेत एकाला वाचवले, मात्र आशुतोष पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

आशुतोष बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने मित्रांनी मामा गोविंद जोशी यांना घटनेची माहिती दिली. स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करून आशुतोषला पाण्याबाहेर काढले व प्राथमिक उपचार केले, त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आशुतोषला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.









