⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अरे बापरे.. एसपींच्या बंगल्या शेजारील भिंतीवर लिहिली आक्षेपार्ह पोस्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । जळगाव (Jalgaon) शहरातील मुख्य गजबजलेला चौक म्हणजे काव्य रत्नावली चौक. याच चौकालगत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (Superintendent of Police Dr. Praveen Mundhe) यांचे निवासस्थान ‘अभय’ आहे. पोलीस अधिक्षकांच्या बंगल्याला लागूनच काव्यरत्नावली चौकाकडून मेहरूणकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या भिंतीवर काही टारगटांनी व्यवस्थेचा निषेध करणारी पोस्ट लिहिलेली आहे. भर चौकात दिवसभर ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या नजरेस ही पोस्ट पडत असते.

जळगाव शहराचा विस्तार जसजसा वाढत आहे तशी विकृती देखील वाढत चालली आहे. कोण केव्हा कुठे काय कृती करेल याचा काही नेम राहिला नाही. काही दिवसांपूर्वीच एका माथेफिरूने चारचाकी, दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. कोणी मध्यरात्री भर चौकात फटाके फोडतो तर कुणी बुलेटच्या सायलेन्सरचा गन शॉट सारखा आवाज काढतो. जळगावातील तरुणाई व्यसनाधीन होत चालली असून नशेतच असे कृत्य घडतात. नुकतेच असाच एक प्रकार समोर आला असून दिल्ली, मुंबईत सहसा घडणारे हे प्रकार जळगावात आणि ते देखील पोलीस अधिक्षकांच्या घरा शेजारी घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा पोलीसदलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ आहे. पोलीस अधिक्षकांच्या घराजवळच शहरातील सर्वात सुंदर आणि रात्रीच्या वेळी मोठी गजबज असलेला काव्य रत्नावली चौक आहे. पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाला लागून एक मोकळी जागा असून त्याठिकाणी कांताई उद्यान प्रस्तावित आहे. रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून असलेल्या या भिंतीवर नेहमी काही ना काही उपक्रम राबविण्यात येतात किंवा संदेश लिहिले जातात.

सध्या ती भिंत एका वेगळ्याच संदेशमुळे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत आहे. काही टारगटांनी भिंतीवर थेट व्यवस्थेचा निषेध करीत व्यवस्थेला शिवीगाळ करणारी पोस्ट लिहिली आहे. एकीकडे HipHop चे स्वागत तर दुसरीकडे ‘Fuck the System’ असे लिहीत टारगट तरुणांनी थेट व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. काव्यरत्नावली चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्या टारगट तरुणांना शोधणे अवघड नसले तरी अशी प्रवृत्ती ठेवण्यासाठी पोलिसांना ते कष्ट घ्यावे लागणार आहे.