जळगाव जिल्हा

प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! उधना–अमरावती स्पेशल ट्रेनला मंजुरी; जाणून घ्या थांबे अन् वेळापत्रक

जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भादरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने उधना ते अमरावतीदरम्यान सुपरफास्ट विशेष रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही गाडी २६ ऑक्टोबरपासून साप्ताहिक स्वरूपात धावणार असून या गाडीला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला, यामुळे सणासुदीत प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

उधना आणि अमरावतीदरम्यान थेट रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना विदर्भात जाण्यासाठी सोयीचा पर्याय मिळावा, तसेच गुजरातमधील उधना परिसराशी रेल्वे संपर्क अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. खासदार स्मिता वाघ यांनीही या मागणीसाठी प्रयत्न केल्याने विशेष रेल्वेला मंजुरी मिळाली आहे.

उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस उधना स्थानकावरून दर सोमवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी नंदुरबार येथे दुपारी २ वाजून ४८ मिनिटांनी, अमळनेर येथे दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी, धरणगाव येथे दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी, जळगाव येथे सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी, तर भुसावळ येथे सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी पोहचणार आहे. या वेळापत्रकामुळे मार्गावरील विविध स्थानकांतील प्रवाशांना उधनाहून पुढील प्रवासासाठी रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे.

परतीच्या प्रवासात अमरावती–उधना सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस दर सोमवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी अमरावती येथून सुटणार आहे. ती मंगळवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी भुसावळ, ४ वाजता जळगाव, ४ वाजून ५० मिनिटांनी धरणगाव, सकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी अमळनेर आणि ५ वाजून २७ मिनिटांनी नंदुरबार येथे पोहचणार आहे. त्यामुळे विदर्भातून भुसावळ, जळगावमार्गे उधना परिसरात जाणाऱ्या प्रवाशांनाही या विशेष गाडीचा उपयोग होणार आहे.

सध्या रेल्वेचा आवश्यक रेक उपलब्ध नसल्यामुळे उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस चालवण्यात येणार आहे.  या नवीन सुपरफास्ट ट्रेनमुळे खानदेशातून सुरत, उधना तसेच विदर्भाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्ग, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायक होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button