रोखीने वीजबिल भरण्यासाठी आता इतक्या हजाराची मर्यादा

ऑक्टोबर 27, 2021 6:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । महावितरणच्या सर्व ग्राहकांना येत्या सोमवार दि.१ पासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून मोबाईल ऍप व संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MSEB jpg webp

महावितरणकडून रोखीने स्वीकारण्यात येणाऱ्या वीजबिलाच्या रकमेवर दि.१ नोव्हेंबरपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यासाठी यापुढे पाच हजार रुपयांची मर्यादा राहणार आहे. परंतु त्यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन सेवा’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच धनादेशाद्वारेदेखील रक्कम स्वीकारली जाणार आहे. तथापि मुदतीनंतर धनादेश क्लीअर झाल्यास विलंब आकार शुल्क आणि कोणत्याही कारणास्तव धनादेश अनादरित झाल्यास प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे.

‘ऑनलाईन’साठी अनेक पर्याय उपलब्ध
पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम महावितरणच्या http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावरुन किंवा महावितरण मोबाईल ऍपद्वारे भरता येणार आहेत. त्याशिवाय चालू व मागील वीजबिल पाहणे, मागील पावत्या व तपशील पाहणे ग्राहकांसाठी घरबसल्या शक्य आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांचे बील भरण्यासह इतर सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५००/- रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड वगळता सर्व ‘ऑनलाईन’द्वारे होणारा भरणा हा निशुल्क आहे.

याद्वारे करा तक्रार
‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते. वीजबिल भरण्यासंदर्भात काही तक्रार किंवा शंका असल्यास ग्राहक [email protected] या ईमेलद्वारे महावितरणशी संपर्क साधू शकतात. सद्यस्थितीत महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा सुमारे १४०० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’द्वारे भरणा करीत आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी कोरोना महामारीच्या काळात रांगेत उभे राहून किंवा इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now