⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

आरटीई प्रवेश प्रक्रियेकरिता आता २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । शालेय शिक्षण विभागातर्फे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी २८५ शाळांनी नोंदणी केली असून, पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या २९४० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र प्रवेश पूर्ण न झाल्याने आता २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीई २५ टक्केची ऑनलाइन अर्ज दाखल केल्यांनतर मार्च महिना खेरीस पहिली सोडत ऑनलाइन स्वरूपात झाली. यात २९४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, २३९९ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना २० एप्रिलपर्यंत शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती; मात्र शेवटच्या दिवसापर्यंत फक्त १७५३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केल्याने २९ पर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २८५ शाळा पात्र आहेत. त्यामध्ये एकूण ३१४७ एवढी प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी एकूण ८३५४ जणांचे अर्ज दाखल झालेले आहे. दरम्यान, ५ एप्रिलपासून प्रवेश सुरू झाले असून, आतापर्यंत १७५३ विद्यार्थ्यांनीच निश्चित केले आहे.