⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

दीपक केसरकर तुम्ही उद्धव ठाकरेंची भांडी घासा – निलेश राणे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । दीपक केसरकर विरुद्ध राणे घराणं हा वाद कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहे. 2014 साली दीपक केसरकर राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये राणेविरोधात लढण्यासाठीच आले होते. मात्र आता दीपक केसरकर आणि राणे वाद पुन्हा उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे यांचा तुम्हाला जर इतकाच पुळका असेल तर दीपक केसरकर यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भांडी घासावीत असं ट्विट निलेश राणे यांनी केल आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड घडवलं आणि तब्बल ५० आमदार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत युती करत शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष असं युतीच सरकार महाराष्ट्र मध्ये तयार झाला आहे. या सगळ्यांमध्ये दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत. आणि कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी काहीही चुकीचं विधान करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल चुकीच विधान हे शिंदे गटाला मान्य नसेल अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये, नारायण राणे यांची दोन्हीही पुत्र हे निरागस असून त्यांना योग्य समज दिला गेला तर, ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काहीही बोलणार नाहीत. असं विधान दीपक केसरकर यांनी केलं होतं.

दीपक केसरकर यांच्या या पत्रकार परिषदेवर ट्विट करत व्हिडिओच्या माध्यमातून दीपक केसरकर यांनी लायकीत रहावं. असं निलेश राणे म्हणाले होते. यावर बोलताना दीपक केसरकर यांनी राणेंना त्यांची लायकी मतदारांनी दाखवून दिले असल्याचे म्हटले. यामुळे त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर काहीही टीका करू नये अशी विनंती यावेळी केसरकर यांनी केली होती.

मात्र निलेश राणे यांनी आता अजून एक नवीन ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा इतकाच पुळका असेल तर त्याच्या घरी जाऊन मातोश्रीवर भांडी घासा असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. यामुळे आता या ट्विटवर दीपक केसरकर नक्की काय उत्तर देतात आणि राणे केसरकर वाद नक्की कोणत्या टोकाला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.