जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । सध्या नवीन केळी कापणीच्या हंगामाला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. कापणी योग्य तयार असलेल्या शेत मालाला व्यापारी वर्गातून चिलिंग व नॉन चिलिंग असे वर्गीकरण करून मागणीसह भावात दुजाभाव केला जात आहे. यामुळे केळी बाजारात खरेदीचा नवीन ट्रेंड शेतकऱ्यांसह सर्वांना आश्चर्य चकीत करीत आहे. चिलिंग नसलेल्या केळीला व्यापारी ३०० रुपयाच्या जास्त फरकाने खरेदी करीत असल्याचे शेतकरी सांगत आहे. दरम्यान हा प्रकार साधारण १५ एप्रिल पर्यंतच राहणार असल्याचे जानकरांचे म्हणणे आहे.

डिसेंबर पूर्वी काही भागात कडाक्याच्या थंडीत निसवन झालेल्या बागेत चिलिंगचे प्रमाण जास्त असते. यावेळेस निसवन होऊन केळीचा घड तयार होतांना अति थंडीमुळे तापमान कमी असते. त्यावेळेस तयार होणाऱ्या केळीतील पेशींमध्ये बर्फ जमून पेशी नष्ट होतात. परिणामी त्या पेशी पांढऱ्या ऐवजी तांबड्या होतात व केळीतील पाण्याचे प्रमाण शून्य होते. त्यामुळे अशी केळी कापणी नंतर कोल्ड स्टोरेजमध्ये पिकल्यावर जास्त काळ टिकत नाही व त्यावर गळद पिवळा रंग सुद्धा येत नसल्यामुळे बाजारात मागणीवर फरक पडतो.
तसेच अशा शेत मालात केळीत पाणी कमी असल्यामुळे वजनात सुद्धा घट येत असून, सरासरी मिळत नाही. त्यामुळे २५ किलो वजन ऐवजी २१ ते २१ किलो वजन येऊन ५ किलो वजन प्रती घड वजन घटते. त्यामुळे शेतकरी सुद्धा केळीवरील चिलिंगमुळे नुकसानीत असतो. त्याउलट स्थिती नॉन चिलिंग केळीची आहे. चिलिंग नसलेल्या केळीला व्यापारी ३०० रुपयाच्या जास्त फरकाने खरेदी करीत असल्याचे शेतकरी सांगत आहे. उदा. नॉन चिलिंग केळीला अंदाजे १८०० रुपये भाव मिळत असेल तर चिलिंग केळीला १५०० रूपये भावात खरेदी केली जात आहे.