⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

ओमायक्रॉनचा धोका : नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या काय आहेत निर्बंध ?

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली होती. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

‘भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते’
एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले आहेत. आगामी ख्रिसमस, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण नियमावली?

आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील.

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

हेही वाचा :