⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

प्रभारी राजमुळे तालुक्याच्या विकासासह पंचायत समिती कारभाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?

पंचायत समितीचे माजी गट नेते शेखर सोपान पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप!

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथील पंचायत समिती मध्ये गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रभारी राजमुळे तालुक्याच्या विकासासह पंचायत समिती मधील भोंगळ कारभाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी गट नेते शेखर सोपान पाटील यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

यावल येथील पंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षापासून गटविकास अधिकारी हे प्रभारी राहीले असल्याने पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच अधिकाऱ्यांकडे हा प्रभार राहिल्यामुळे विविध विभागातील १५ तक्रारी मासिक मीटिंगमध्ये केल्या मात्र संबंधित विभागाकडून त्याचे अद्यापही निराकरण होत नसल्याचा आरोप शेखर पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.पंचायत समिती मधील ग्रामविकास विभाग,बांधकाम विभाग,कृषी विभाग,तसेच महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या सुमारे १५ तक्रारी मासीक बैठकीत करण्यात आल्या होत्या ह्या तक्रारी मासिक बैठकीतही पटलावर ठेवण्यात आल्या होत्या मात्र प्रभारी गटविकास अधिकारी सतस बदलत राहिल्याने तसेच विविध विभागात असलेल्या प्रभारी राजमुळे त्या तक्रारी तशाच प्रलंबित राहिल्या असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.वरिष्ठांकडेही तक्रारी सादर करून तक्रारींचे निराकरण झाले नसल्याचे सांगत पंचायत समितीच्या कोणत्याही विभागात अधिकारी,कर्मचारी नियमित हजर राहत नसल्याची तक्रारही त्यांनी करत यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याबाबत पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की गेल्या दोन महिन्यापूर्वी शेखर पाटील यांनी एक तक्रार केली होती त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत माझ्याकडे दोन महिन्यापूर्वीच पदभार आला असून मागील काळातील त्यांचे तक्रारी संदर्भात माझ्याशी बोलणे झाले नाही तरीही त्यांच्या प्रलंबित तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी दिले आहे.