‘चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याचा शब्द फिरवला, खडसेंचा टोला
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचा (BJP) पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यांना जुन्या वक्तव्याची आठवणही करून दिली जात असून अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही पाटील यांना टोला लगावला आहे.
‘चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याचा शब्द काही क्षणांत फिरवला असून याबाबत मला आश्चर्य वाटत आहे,’ असा चिमटा एकनाथ खडसे यांनी काढला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शब्द देताना विचार करायला हवा होता किंवा आता त्याचं पालन करायला हवं होतं. मात्र पाटील यांनी अनेकदा अशा घोषणा केल्या, परंतु त्यांची ते अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील हिमालयात जाण्याबाबत नेमकं काय म्हणाले होते?
चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल. जर निवडून नाही आलो, तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन.”