⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन, फडणवीसांना कोठडीत टाकणार होते : मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार असून त्यावेळी मी काय म्हणालो होतो, हे मी योग्य वेळी सांगेन ,’ असाही खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज म्हणजेच सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. त्यापूर्वी रविवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमानंतर एका पत्रपरिषदेत ते बोलत होते.

“आमच्यावर विरोधकांना धमकवल्याचा आरोप केला जातो. मात्र, ठाकरे सरकारने रवी राणा-नवनीत राणा यांना अटक केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उचलून नेलं होतं. एवढी तत्परता ठाकरे सरकारने दाखवली. कंगणा रानौतचं घर पाडण्यात आलं. केतकी चितळेला अटक करण्यात आली. गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्याची तयारी होती. त्याची कॅसेटही बाहेर आली.

गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना अटक करण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी मी तिथे होतो. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना आता घाला, या वक्तव्याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी मी काय म्हणालो होतो, हे मी योग्य वेळी सांगेन. हे सर्व उद्योग कोण करत होतं, हे सर्व मला माहिती आहे”, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं. आम्ही चहापानाला गेलो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून त्यांची मानसिकता दिसून आली. मला त्यांना सांगायचे आहे की, दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली, असा टोला त्यांनी लगावला.