⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

‘निसर्गोपचार’ हे रोगमुक्तीचे प्रभावी साधन : पूजा पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । नैसर्गिक जीवनशैलीचे उल्लंघन केल्यास रोगापासून कोणीही वाचू शकत नाही, म्हणून नैसर्गिक जीवनशैली महत्त्वाची आहे. ‘निसर्गोपचार’ हे रोगमुक्त करण्याचे प्रभावी साधन आहे, असे मत मध्यप्रदेशातील गायत्री धामच्या पूजा पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी विभागाच्यावतीने राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त ‘रोगमुक्त भारत अभियान में निसर्गोपचार कि भूमिका’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना पूजा पाटील यांनी, आपण अनुभवत असलेल्या विविध दुर्धर आजारावर नैसर्गिक उपचार कसे करावेत, नैसर्गिक उपचार करून कोरोना महामारीच्या काळात स्वत:ला स्वस्थ ठेवण्यासाठी निसर्गोपचार कशा पद्धतीने सहायक ठरतो, याविषयी मार्गदर्शन केले. राजर्षी टंडन मुक्त विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक अमित कुमार सिंग यांनी ‘भारतीय संस्कृती आणि निसर्गोपचार’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, प्राचीन ऋषी मुनींनी प्राकृतिक जीवन पद्धतीचा अवलंब केल्यामुळेच ते स्वस्थ आणि दीर्घायू जीवन जगू शकले. भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दैनंदिन आचरणातील विविध बाबी आपल्याला मानसिक आणि शारीरकस्तरावर स्वास्थ्य प्राप्त करून देत आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात याविषयी विचार व्यक्त केले. दि.१९ नोव्हेंबर रोजी नैसर्गिक उपचारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी साधकांना, स्पायनल बाथ, कूल पॅक, चुंबक चिकित्सा, एक्युप्रेशर इत्यादी नैसर्गिक उपचार देण्यात आले.

वेबिनार आणि निसर्गोपचार कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सं.ना. भारंबे आणि संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे याचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय वेबिनार कार्यक्रमाची सुरवात ओंकार प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ.देवानंद सोनार यांनी तर सूत्रसंचालन निसर्गोपचार समन्वयक प्रा.सोनल महाजन यांनी केले तर आभार प्रा.पंकज खाजबागे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निसर्गोपचार समन्वयक प्रा.अनंत महाजन, प्रा.गीतांजली भंगाळे, प्रा.ज्योती वाघ, विकास खैरनार, वासुदेव चौधरी, पूनम बारी, चेतना बारी, माधवी तायडे आदींनी परिश्रम घेतले.