⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

MVA Government Colloapsed : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार, खा.संजय राऊत यांनी दिले संकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । शिवसेनेचे जेष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे हे ४६ आमदार घेऊन आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राज्यातील सरकार कोसळणार असल्याचे म्हटले जात असून शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी ट्विट करीत राज्यातील सरकारची वाटचाल बरखास्तीच्या दिशेने असल्याचे म्हटले आहे. राऊत यांच्या ट्विटमुळे आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे.

वर्षभरापासून नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. तसेच त्यांच्या गटातील अनेक आमदार देखील महाविकास आघाडीवर नाराज आहेत. राज्यसभेनंतर विधान परिषदेत देखील भाजपने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेने बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदेसह अंदाजे ३० आमदार नॉटरिचेबल होते. शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काही प्रस्ताव दिल्याचे समोर आले होते. मात्र शिंदे यांनी त्याचे खंडन केले.
हेही वाचा : विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती? शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रश्‍न

आज सकाळी शिंदे यांनी माझ्याकडे ४० आमदार असल्याचे सांगितले होते. तसेच नव्याने निवड केलेल्या गटनेत्याची निवड चुकीची असून स्वतंत्र गट स्थापनेचे संकेत शिंदे यांनी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काही मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे वृत्त सकाळपासून समोर येत असून हळूहळू एक एक आमदार नॉट रिचेबल होत आहेत. खा.संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले असून सरकारची वाटचाल बरखास्तीच्या दिशेने असल्याचे म्हटले आहे.

खा.राऊत यांच्या ट्विटमुळे ठाकरे सरकार कोसळणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे.