जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रवचनकार पंडित श्री.प्रदीपजी मिश्रा यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील सीहोर कुबेरेश्वर धाम येथे शिव महापुराण कथा आणि रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. गेल्या वर्षभरात पंडित मिश्रा महाराज यांची ख्याती जगभर पसरली असून त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. महाराज सांगत असलेले उपाय आणि प्रवचन उत्तम असल्याने त्यांच्यावरील निष्ठा दिवसेंदिवस वाढत आहे. धर्म जागृती आणि संघटनाचे महान कार्य ते करीत आहे.
गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात सीहोर येथे रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आठ दिवसात १५ लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी ५ लाख भाविक पोहचले आणि गोंधळ उडाला. महामार्ग ठप्प झाले. भाविकांचे हाल होऊ लागले. प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले. नाईलाजाने कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करीत असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहीर केले.
यंदा देखील १६ फेब्रुवारीपासून सीहोर येथे रुद्राक्ष वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वीच एक दिवस अगोदर तब्बल २ लाख भाविक येऊन पोहोचले. पहिला दिवस उजाडला तोवर संख्या पाच पट झाली. भोपाळ-इंदौर महामार्ग तब्बल ३० किलोमीटरपर्यंत जाम झाला असून दुसरीकडे इतर महामार्ग आणि लहान मार्ग देखील जाम झाले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता यंदा एक दिवस अगोदरच २४ तास रुद्राक्ष वाटप सुरू करण्यात आले होते. चक्काजाममध्ये सकाळी १० वाजेपासून अडकलेले नागरिक सायंकाळी ६ वाजेपर्यंत देखील त्याच ठिकाणी अडकून आहेत. खाण्यापिण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकांचे विशेषतः बालक, वयोवृद्धांचे मोठे हाल होत आहे.
रुद्राक्ष वितरण रांगेत अंदाजे २ लाख भाविक उभे असून गर्दी, धक्काबुक्की, उन्हामुळे हाल झाल्याने जवळपास २ हजार भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गर्दीत अचानक चक्कर आल्याने मालेगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर ३ महिला बेपत्ता आहेत. गर्दी जास्त असल्याने मोबाईल नेटवर्क देखील जाम झाले असून अनेकांच्या मोबाईलवर संपर्क होत नाही. गर्दी लक्षात घेता स्वतः मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी आपला दौरा रद्द केला. भाविकांची गर्दी पाहता प्रत्येकाला रुद्राक्ष मिळेलच याची शाश्वती नाही शिवाय गेल्यावर्षीप्रमाणे यंदा देखील कार्यक्रम रद्द करण्याची वेळ उद्भवू शकते. प्रशासनाने गेल्या वर्षीच्या परिस्थितीवरून काहीही बोध घेतलेला दिसून येत नाही.
रुद्राक्ष मिळेल तेव्हा मिळेल पण त्यासाठी आजच हाल सहन करून जीव देण्याचे धारिष्ट्य दाखवू नका. सीहोर जाण्यासाठी केलेला खर्च पहिला तर तेवढ्या पैशात कितीतरी खरेखुरे रुद्राक्ष विकत घेता येतील. आपणच खरेदी केलेले रुद्राक्ष आपल्याच देव्हाऱ्यात ठेवून भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करीत महाकालचे नामस्मरण करा. देव सर्व ठिकाणी एकच असून सारखेच पुण्य आपल्या वाटेला येणार आहे. सीहोर कुबेरेश्वर धाम जेव्हा गर्दी नसेल तेव्हा जा आणि निवांत दर्शन घेऊन या. कृपया आजच जाण्याचा अट्टाहास करू नका. विशेषतः बालक, वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असलेल्यांनी तर घरीच राहून टिव्हीवर कथेचा आनंद घ्या. रुद्राक्षच्या लालसेने नव्हे तर कथेचा आनंद घेण्यासाठी या, असे आवाहन खुद्द पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले आहे.
सर्व भाविकांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून घरी आराम करा. गर्दीत जीव गेल्यास कुणीही वाचवायला येणार नाही कारण चक्काजाममध्ये तात्काळ उपचार मिळणे देखील शक्य नाही. मालेगाव येथील भाविक मंगलाबाई यांचा मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्यानेच झाला आहे. आयोजक आणि प्रशासन व्यवस्था करत असले तरी ते अन्न, पाणी पुरवण्यासाठी असक्षम ठरले आहेत. पुढील निर्णय तुमचाच..!