बाबो..! जळगावात सोन्याच्या कारागिराची तब्बल 2.45 कोटींची फसवणूक; बंगालचे दोघे फरार

ऑगस्ट 18, 2026 9:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच जळगावच्या शनिपेठ परिसरातील सोन्याच्या कारागिराचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

crime 2 jpg webp

विद्युत निरोध बाग (सध्या रा. २३१ शनिपेठ, जळगाव. मूळ रा. चंद्रकोना टाऊन, जि. पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) आणि राजु बिपीन चौधरी (रा. घाटाल, जि. पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असं फसवणूक करणाऱ्या आरोपींचे नाव असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात पश्चिम बंगालमधील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपी फरार आहेत.

काय आहे नेमकी घटना?

फिर्यादी नबाकुमार गोरहरी धारा (वय ४१) हे सोन्याचे कारागीर असून शनिपेठ परिसरात ‘आयुष ज्वेलर्स’ नावाने व्यवसाय करतात. त्यांच्या परिचयातील विद्युत बाग आणि राजु चौधरी, दोघांनी त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी नबाकुमार यांच्या दुकानातून ऑक्टोबर २०२५ ते ३० मे २०२६ या सात-आठ महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी एकूण १७५५.३४० ग्रॅम (सुमारे पावणे दोन किलो) वजनाचे २२ कॅरेट शुद्धतेचे तयार सोन्याचे दागिने घेतले. या दागिन्यांच्या मोबदल्यात २४ कॅरेट सोन्याची लगड अथवा त्याची रोख रक्कम देण्याचे ठरले होते.

मात्र दागिने घेतल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे सोन्याची लगड किंवा पैसे दिले नाहीत. त्यामुळे धारा यांची तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

फसवणूक लक्षात आल्यानंतर धारा यांनी १७ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विद्युत बाग आणि राजु चौधरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३१६(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक संतोष खेडकर तपास करीत आहेत. आरोपी पश्चिम बंगालमधील असल्याने त्यांच्या शोधासाठी तपासाची दिशा राज्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now