जळगाव लाईव्ह न्यूज । सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत जळगाव जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अकोला येथून ताब्यात घेतले. आरोपीकडून तब्बल ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इराणी वस्ती, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुरनं. १२९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच बोदवड पोलीस ठाण्यात गुरनं. १२८/२०२६, कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू असताना तो अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अकोला येथे जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील ३२ ग्रॅम ४०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, तसेच बोदवड पोलीस ठाण्याच्या चोरीच्या गुन्ह्यातील १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, असा एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोहेकॉ. गोपाळ गव्हाळे, पोना. विकास सातदिवे, पोकॉ. प्रशांत परदेशी, पोकॉ. राहुल वानखेडे, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चापोकॉ. रिजवान शेख तसेच तांत्रिक मदत पोकॉ. गौरव पाटील व पोकॉ. मिलींद जाधव पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस नाईक विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.










