.जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । शहरातील हरिविठ्ठल नगरातील प्रमुख रस्त्याचे अतिक्रमणाविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून धडक मोहिम राबविण्यात आली. रस्ते व गटारींच्या कामांना अडथळ निर्माण होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली
यात ८० ओटे, वॉलकंपाऊड, बाथरुम, पत्र्याचे शेड काढण्यात आले.शहरातील विविध भागातील रस्ते व गटारींचे कामे मंजुर झाले आहेत. ही कामे करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गं बुधवारी सकाळी १०.३० वाजता कारवाईला सुरुवात झाली आहे. दिवसभरात ८० अतिक्रमणे तोडण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. तसेच उर्वरीत अतिक्रमन दोन दिवसात काढण्याचा अल्टीमेटम संबधित मालमत्ता धारकांना देण्यात आला आहे. या दोन दिवसात अतिक्रमन न काढल्यास पालिकेकडून त्यांचे अतिक्रमन काढण्यात येणार असून त्यासाठी लागणारा खर्च संबधित त्या त्या घर मालकांकडून वसुल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
वाघ नगरच्या कोपऱ्यापासून कारवाईला सुरुवात झाली असून खंडेराव नगरच्या पुलापर्यंत कारवाईचा शेवट केला जाणार आहे. या कारवाईसाठी महापालिकेचे नगररचना विभागाचे अतुल पाटील, चित्र शाखेचे सुभाष मराठे, हेमंत विसपुते, बांधकाम विभागाचे मनोज वडनेरे, संजय कोळी, किशोर सोनवणे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक उपस्थित होते. तसेच वाद विवाद टाळण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. दरम्यान, काही लोकांनी मनपाच्या पथकाशी वाद घातला असता पोलिसांनी वाद मिटविला.