Jalgaon : थंडीमुळे केळी बागांवर करपाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी?
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२४ । सध्या जळगाव जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र या वाढत्या थंडीमुळे केळी बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. आधीच केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव असताना करपानेही डोकं वर काढले असून यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण तयार झाल्याने जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. मात्र आता ढगाळ वातावरण निवळले असून तापमानात घसरण झाल्याने थंडी वाढली. कडाक्याच्या थंडीमुळे केळी बागांवर करपासदृश रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. थंडीतील करपा व चरका या रोगांमुळे केळी बागांचे मोठे नुकसान होते. पर्यायाने केळी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यासाठी केळी उत्पादकांनी प्राथमिक अवस्थेतच काळजी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
थंडीमुळे केळी बागांमधील केळीच्या पानांवर लाल तांबूस आकाराचे छोटे छोटे ठिपके दिसू लागले आहे. केळी पानांच्या कडा करपू लागल्या आहे. येणाऱ्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढल्यास करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. दरम्यान, केळीवर आधीच सीएमव्हीचा प्रादुर्भाव असताना करपानेही डोकं वर काढले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास केळीला फटका बसतो. पीक विमा काढला असला तरी त्यात रोगांमुळे केळीचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळत नाही.
करप्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना…
कडाक्याच्या थंडीमुळे केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर बुरशी- नाशक औषधांची फवारणी करावी.
केळीच्या पिकांमधील उष्णता कायम राहण्यासाठी पिकाला रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे
त्याचसोबत बागांमध्ये शेकोटी पेटवून धूर केल्यास तापमान कायम राहते.
केळीचा पोंगा काळा पडत असेल तर आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी करावी.
केळीबाग आणि शेताचे बांध शक्यतो तणमुक्त ठेवावे.
खोडालगत आच्छादन करावे. जेणेकरून कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही.
बागेत अतिरिक्त आर्द्रता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
करपा रोगनियंत्रण
हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील चार ते पाच पानांवर सुरुवातीला लहान-लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो.