ललित कोल्हेंच्या अडचणीत वाढ; नव्या गुन्ह्याप्रकरणी आता मुंबई पोलीस घेणार ताब्यात..

फेब्रुवारी 26, 2026 1:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बोगस कॉल सेंटर प्रकरणात सध्या नाशिक कारागृहात असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणात त्यांना लवकरच आपल्या ताब्यात (वर्ग करून) घेणार आहेत.

lalit kolhe

काय आहे नेमके प्रकरण?

मुंबईतील सुतार चाळ परिसरातील रहिवासी तथा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे कृष्णा धनाराम देवासी (वय २९) यांना ललित कोल्हे यांनी ६८ लाख रुपये किमतीची कार अवघ्या ३८ लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी वाहन खरेदीच्या रकमेपैकी १० टक्के आगाऊ रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली होती.

तक्रारदाराचा विश्वास संपादन करून २४ नोव्हेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत कोल्हे यांनी स्वतःच्या बँक खात्यावर तसेच राकेश चंदू अंगारीया आणि एका हॉटेलच्या खात्यावर वेळोवेळी एकूण १४ लाख ३९ हजार १०० रुपये वळते करून घेतल्याचा आरोप आहे.

मात्र, पैसे भरूनही वाहन न मिळाल्याने आणि दिलेली रक्कम परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे देवासी यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे येथे २२ एप्रिल २०२५ रोजी कोल्हे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, जळगावातील गाजलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात कोल्हे सध्या नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता या नव्या गुन्ह्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असून, मुंबई पोलिसांकडून त्यांना वर्ग करून घेण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now