जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । मध्यप्रदेशातून मुक्ताईनगर परिसरातून महाराष्ट्रात अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून याबाबत पोलिसांकडून कारवाया केल्या जात असून देखील गुटखा तस्करी थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्कॉर्पिओ वाहनातून होणार्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. याबाबत वाहन चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडून तब्बल एक कोटींपेक्षा जास्त रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यानंतर स्कॉर्पिओतून गुटखा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. मुक्ताईनगर पोलिसांना बर्हाणपूरवरून एक स्कॉर्पिओतून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून काल रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास एमएच२७ डीएल-२४९६ क्रमांकाच्या स्कॉर्पिओला थांबविले असता यातून २२ लाख ३८ हजार ५० रूपयांचा अवैध गुटखा आढळून आला.
पोलिसांनी गाडीचा चालक अजीज शेख बाबू शेख (रा. झांसी नगर, रिसोड, जिल्हा वाशिम) याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर कारवाई ही डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरिक्षक राहूल बोरकर, राजेंद्र खनके, छोटू वैद्य, देवसिंग तायडे, विशाल सपकाळे व निखील नारखेडे यांच्या पथकाने केली.