⁠ 
शनिवार, मे 18, 2024

प्रलंबित मागण्यांसाठी वैद्यकीय अध्यापकांचे अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । विविध प्रकारचे भत्ते सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे मिळाले पाहिजे, करार पद्धतीने नियुक्त्याचा निर्णय रद्द करावा अशा विविध रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक १४ मार्चपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. गुरूवारी १० मार्च रोजी आंदोलन तीव्र झाले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापकांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत प्रचंड घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर शुक्रवारी ४ मार्च रोजी सकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. सोमवारी ७ रोजी घंटानाद करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांना घेराव घालण्यात आला होता. बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते.

सातव्या वेतन आयोगात मिळणारी करिअर ऍडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू केली पाहिजे, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन केले पाहिजे, सातव्या वेतन आयोगात पदव्यूत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू केल्या पाहिजे, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांना प्राधान्य दिले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी १४ मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन विविध प्रकारचे आंदोलन करीत आहे.

गुरुवारी १० मार्च रोजी अध्यापकांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. शासनाने मागण्या मान्य केल्याचं पाहिजे, ‘असे कसे देत नाही,घेतल्याशिवाय राहणार नाही” आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

शुक्रवारी ११ मार्चला देखील अधिष्ठाता कार्यालयासमोर घोषणा देऊन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या सचिव डॉ.योगीता बावस्कर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे जळगावचे सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ.किशोर इंगोले, डॉ. अरुण कसोटे, डॉ.संदीप पटेल, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. संगीता गावित, डॉ. इमरान तेली, डॉ. भारत घोडके, डॉ. विजय गायकवाड, डॉ. धनश्री पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. किरण सोनवणे, डॉ.मनोज पाटील, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मोनिका युनाती, डॉ. प्रशांत सरोदे, डॉ. विलास मालकर आदि अध्यापक निवेदन देताना उपस्थित होते.