⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

‘आई’च्या संस्कारांनी घडलेली लेकरं अपयशी होत नाही ; डाँ. रामपाल महाराज

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजामातेच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापन केले. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या संस्करांनी घडले. आणि जगात लौकिक मिळवला. त्यामुळे आईच्या संस्कारांनी घडलेली लेकरं आयुष्यात अपयशी होत नाही. असे प्रबोधन प्रबोधनकार सुप्रसिद्ध सप्तखंजिरी वादक डाँ. रामपाल महाराज धारकर यांनी केले. पारोळा येथील मोठा महादेव चौकात विजया केसरी प्रतिष्ठान (जळगाव) तर्फे रविवारी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख वक्ते म्हणून डाँ. रामपाल महाराज बोलत होते.

प्रारंभी विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील (जाधव) विजया अरुण पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलीत करून कीर्तनाला सुरुवात करण्यात आली. प्रबोधनकार डाँ. रामपाल महाराज पुढे म्हणाले की, सर्व संत, महात्मे, महापुरुष विविध जातीत जन्माला आले. पण त्यांनी जातीभेद पाळला नाही. जातीपातीचा कधी गलबला केला नाही. सर्व समाजासाठी सर्व महापुरुषांनी कार्य केले आहे. मात्र सध्या महापुरुषांना जाती-जातीत विभागण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कोणत्याही महापुरुषाने कोणत्याही एका समाजासाठी कार्य केले नाही. तर सर्व समाजासाठी विधायक कार्य केली आहेत. त्यामुळे महापुरुषांना जाती-पातीच्या जोखडात अडकवू नका, वाटून घेऊ नका. आपत्कालीन समयी जात विचारली जात नाही. त्यावेळी माणुसकी बघितली जाते. म्हणून जात पात बकवास आहे.
माणुसकी हा जगातला सर्वात मोठा धर्म असल्याचे डाँ. रामपाल महाराज यांनी सांगितले.

अपयशाने खचून जाऊ नका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध संघर्षमय गड- किल्ल्याची लढाईची दाखले देवून छत्रपती शिवाजी महाराजांना देखील काही वेळा अपयशाचा सामना करावा लागला होता.असे सांगत तरुणाईने एका अपयशात खचून न जाता पुन्हा प्रयत्न करून यश खेचून आणावे असा मौलिक सल्ला तरुणाईला दिला. सोबतच भविष्य हे हाताच्या रेषेमध्ये नव्हे तर आपल्या मनगटात आहे. यावरही रामपाल महाराज यांनी प्रकाश टाकला.

कीर्तनातून प्रबोधनाचा ‘आनंद’
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तेव्हापासून अध्यात्मिक, धार्मिक वातावरणाची लहर निर्माण झाली आहे. तोच धागा पकडून विजया केसरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘मंदिर श्रद्धा आणि स्वच्छता ध्यास’ हे अभियान जिल्हाभरात राबवून मंदिर चकचकीत करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच गावोगावी आरोग्य शिबीर, कीर्तनाचे आयोजन करून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याचा आनंद आहे.
या सर्व प्रवासात सर्वांचे आशीर्वाद सोबत असू द्या असे विनंती वजा आवाहन विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

कर्तबगार महिलांचा सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक प्रतिभावंत महिलांचा विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे अविनाश पाटील, विजया अरुण पाटील यांच्या हस्ते सोनाली टोळकर, ऍड. कृतिका आफ्रे, मनीषा सोहनी, सुवर्णा पाटील, डाँ. विद्या परोचे, अन्नपूर्णा पाटील, पूनम पाटील यांचा भेटवस्तू , प्रशातीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.