जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पाऊस कोसळत असून अशातच मान्सून पाऊस कधी केरळात दाखल होणार याची प्रतीक्षा सगळ्यांना आहेत. अशांसाठी मान्सूनसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलीय आहे.यंदा वेळेपूर्वीच म्हणजे 25 तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या 25 मे पर्यंत मान्सून हा केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. गेल्या वर्षी 30 मार्च रोजी मान्सूनची केरळमध्ये एन्ट्री झाली होती. मात्र यंदा वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज आहे. दरम्यान यंदा मान्सूनबद्दल गुडन्यूज आहे, ती म्हणजे देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
हवामान खात्याने येत्या 25 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर पंधरा जूनपर्यंत देशातील बहुतांश भागात मान्सूनने व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा भारतामध्ये सरासरी 107 टक्के पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीपूर्व मशागतींना अनेक भागांमध्ये वेग आला आहे.
येत्या 25 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची एन्ट्री दक्षिण भारत आणि मध्य भारतात होणार आहे, मात्र याच दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणजे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. पुढील छत्तीस तास महत्त्वाचे असून, आयएमडीकडून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा देखील मिळाला आहे.