Monsoon Update : पावसाने जळगावकरांना बनवले ‘उल्लू’, ५ दिवस गेला सुट्टीवर

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । मान्सूनचा वेग वाढला असून, मुंबईतून अवघ्या तिसऱ्याच दिवशी मान्सून खान्देशात दाखल झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दाेन दिवस उशिराने मान्सून अखेर साेमवारी खान्देशात दाखल झाला. जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी सध्या मान्सूनने हुलकावणी दिली. पुढील पाच दिवसात जळगावात पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाइटवरून दिसून येतेय. त्यामुळे जळगावकरांना मान्सूनच्या पावसासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी त्यापूर्वी अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने २७ मे राेजी मान्सून केरळात दाखल हाेण्याचा अंदाज वर्तविला हाेता, त्याच वेळी खान्देशात ११ जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज हाेता. मध्यंतरी मान्सून रेंगाळल्याने त्याचे आगमन लांबण्याची शक्यता हाेती. परंतु मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याचा वेग वाढला असून ११ ऐवजी १३ जून राेजी खान्देशात मान्सून दाखल झाला आहे.

मात्र जिल्ह्यात काल मान्सूनने हुलकावणी दिली. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व ढग दाटून येत आहे. रविवारी जिल्ह्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर चांगल्या प्रकारे पावसाची प्रतीक्षा होती. मात्र काल जिल्ह्यात दाखल झालेले मान्सूनने हुलकावणी दिली. पुढील पाच दिवस जिल्ह्याला ‘नो वार्निंग’ दर्शविण्यात आले आहे. एकंदरीत जिल्ह्यात पुढील पाच दिवस कुठल्याही पावसाचा अंदाज नसल्याचे हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाइटवरून दिसून येतेय.