⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

एरंडोलात एटीएम मशीन्समध्ये पैश्यांचा खळखळाट..

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । एरंडोल शहरात अनेक परीसरात ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम केंद्रे आहेत. परंतु, अनेकदा या केंद्रांत पैसे उपलब्ध राहत नसल्याचे ग्राहकांची तक्रार आहे. या केंद्रांवरील मशीन्स मध्ये पैसे काढण्याच्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर मशीनमधुन निव्वळ खळखळाट ऐकू येतो, प्रत्यक्षात रोख पैसे मात्र मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड होत आहे.

त्या तुलनेने मात्र इतर ठिकाणची एटीएम केंद्रे सुरळीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ह्या बँक राष्ट्रीयकृत व अव्वल दर्जाच्या असताना शहरात नव्यानेच सूरू झालेल्या एचडीएफसी या बँकेच्या एटीएम केंद्रावर देखील बहुदा पैसे नसल्याचे सांगीतले जाते. एकंदरीतच सेवा बरोबर नसल्याचे मत ग्राहकांकडून व्यक्त केले जात आहे. पेरणीचा कालावधी काही दिवसांवर असताना शेतकर्यांना बी-बियाणे घेण्यासाठी त्वरीत पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रे हा सोयीचा पर्याय असताना होणारी गैरसोय पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.