Big Breaking : जळगाव शहरातील एका गॅंगवर ‘मोक्का’

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटाच लावला असून एमपीडीएच्या महिनाभरात ४ कारवाया झाल्या आहेत. सोमवारी भुसावळ येथील एकावर एमपीडीए करण्यात आल्यानंतर शहरातील एक गॅंगला मोक्का लावण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्यांना नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा पोलिसांकडून गुन्हेगारांना सळो की पळो केले असून सर्वसामान्यांना उपद्रवी ठरणाऱ्यांवर एमपीडीए आणि मोक्कानुसार कारवाई केली जात आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील एका गॅंगवर मोक्का कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी प्रस्तावाला सोमवारी मंजुरी दिली असून ५ जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील टोळी प्रमुख मोनूसिंग जगदीशसिंग बावरी, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, सोनूसिंह जगदीशसिंग बावरी, सतकोर जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी सर्व रा.सिकलकर वाडा, शिरसोली नाका यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सर्व गुन्हेगार सध्या कारागृहात असून त्यांना मोक्का कायद्यानुसार नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलिसांकडून दमदार कारवाई सुरू असून गुन्हेगारांना धडकी भरली आहे.