जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
30 मार्च 2016 रोजी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, 30 मार्च 2016ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलन केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.अखेर,संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

न्यायालयाने बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनापात्र वॉरंट बजावला होता. त्यानुसार बच्चू कडू आज न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.












