⁠ 
शनिवार, मे 18, 2024

एमआयटी पुणेतर्फे २३ पासून ऑनलाईन भारतीय छात्र संसद, २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचे दि. २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कांताई भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला महापौर जयश्री महाजन, उमविचे डॉ.पंकज नन्नवरे, रायसोनी कॉलेजच्या संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल, भारतीय छात्र संसदचे राज्य विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया, जिल्हा समन्वयक मानसी भावसार, अमित जगताप आदी उपस्थित होते.

सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे अकरावे वर्ष आहे. भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. अकराव्या भारतीय छात्र संसदेचे ऑनलाइन उद्घाटन गुरुवार, दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल व समारोप मंगळवार, दि.२८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होईल.

सहा दिवस चालणाऱ्या या छात्र संसदेत झारखंडचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीया, केंद्रीय जलशक्ती मंत्री राजेंद्र सिंग शेखावत, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्ता अँड. जयवीर शेरगिल, लडाख येथील लोकसभा सदस्य आमयांग त्सेरिंग नामग्याल, बीएसईचे एमडी आणि सीईओ व अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आशिषकुमार चौहान, भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष डॉ. कृष्णा बीर चौधरी, मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गौतम यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय उद्योग, कायदा, अध्यात्मिक व क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर सहा दिवस चालणाऱ्या या ११ व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.

संसदेच्या उद्घाटन समारोपनंतर १० सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यात १. नेतृत्वाचे धडे : नेहरू ते मोदी, २. महामारीनंतर प्राधान्यक्रम : युवा भारताला काय हवे आहे, ३. पर्यावरण सुरक्षा : खूप मोठ्या प्रमाणात चर्चा व कमी प्रमाणात कृती, ४.सेलिब्रिटी आणि स्टारडम : चांगले, वाईट आणि रागीट, ५. भारतीय अर्थव्यवस्था : आरोप-प्रत्यारोपाच्या पलीकडे, ६. सोशल मिडिया : उदयोन्मुख महासत्ता, ७. सार्वजनिक संस्थांची पवित्रता कमी होणे : तथ्य किंवा खोटेपणा, ८. कृषी बीलाला विरोध का?, ९. आंतरराष्ट्रीय संबंध : शेजाऱ्यांशी समेट, १०. राजकारणात युवक : भ्रम आणि यथार्थ अशा विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

भारतीय छात्र संसदेविषयी माहिती
तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतीकारक बदल घडवून आणणे, राष्ट्र समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे या हेतूने २०११ मध्ये भारतीय छात्र संसार झाला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संकल्पक व समन्वयक आहेत. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस सुनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड हे छात्र संसदचे मार्गदर्शक आहे. छात्र संसद हा अ राजकीय उपक्रम असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या अकराव्या छात्र संसदेत देशभरातील महाविद्यालयातून २५ हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्टये
२९ राज्यांतील ४५० विद्यापीठातील २५ हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्याचा थेट सहभाग. १२ केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग असेल, भारतातील १० राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग, भारतातील विविध राज्यातील ४० आमदारांचा सहभाग, देशातील ३० नामवंत विचारवंत विद्याथ्र्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील. या संसदेत देशभरातील ६० विद्यार्थी वक्त्ये असतील.

विद्यार्थ्यांनी आपले नाव www.bhartiyachhatrasansad.org वेबसाईटवर नोंदणी करावी. तसेच सविस्तर माहितीसाठी www.bhartiyachhatrasansad.org/mitsog.org/mitwpu.edu.in या संकेतस्थळांना भेट द्यावी अशी माहिती यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.