जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळावा होणार असून साधूग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवनातील 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात नाशिकसह राज्यभरातील पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तिथे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी सयाजी शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजनांना इशारा दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गिरीश महाजन यांच्यावर टोला लगावला आहे.

अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, “मला इथल्या काही लोकांनी सांगितलं की सरकार इथं प्रदर्शन केंद्र उभारणार आहे. याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर द्यायला हवं. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, तुमचं आणि माझं काही वैर नाही आणि असलं तरी मला काही फरक पडत नाही. कारण इथे प्रश्न झाडांचा आहे. त्यामुळे ‘इथली झाडं तोडू आणि दुसरीकडे नवी झाडं लावू’ अशी वक्तव्ये तुम्ही करू नका.” असं सयाजी शिंदे म्हणाले आहे.

राज ठाकरेंची टीका
दरम्यान मुनगंटीवार 33 कोटी वृक्ष लागवड राबवली होती. मात्र, या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र त्यांनाही ‘क्लीन चिट’ मिळाली. आता मंत्री गिरीश महाजन यांनी एका झाडाच्या बदल्यात पाचपट झाडे लावण्याची भाषा केली जात आहे. यावरून राज ठाकरे यांनी मुनगंटीवार यांचा उल्लेख न करता गिरीश महाजन यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे वर्तुळ हे सध्या उद्योगपतींचे दलाल म्हणून फिरताना दिसत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. सरकारलाच जर पाचपट झाडं लावायला जागा असेल, तर साधूग्रामसाठीची जागा तिथेच का शोधली जात नाही? साधूंच्या नावाखाली उद्योगपतींचे हित साधण्याचा प्रयत्न सुरू असून, जमीन सपाट करून पुढे ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचाच हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.












