⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | गिरणा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

गिरणा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । आज जरी पाऊस पडत असला तरी गिरणा धरण अजून ३६ टक्केच भरलेले आहे. तेव्हा धरणाचे पाणी प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे. अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला आपत्तीसाठी सज्ज राहण्यासाठी आपदा किट, अग्निशमन यंत्रणा देण्याबरोबरच राज्याच्या आपत्ती विभागाचे स्वतःचे सॅटेलाईट यंत्रणा विकसित करण्याचा प्रस्ताव शासनापुढे ठेवण्यात येणार असल्याचेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

गिरणा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली‌. त्यावेळी ते बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील म्हणाले, गिरणा धरणाच्या वरच्या बाजूने सध्या धरणात ६० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे‌. पुढील काही दिवस पाऊस चालला तर धरण पूर्ण क्षमतेने भरेल. पण तोपर्यंत या धरण लाभक्षेत्रातील नागरिकांसाठी पाण्याचा काटकसरीने फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्यात यावा. १५ ऑक्टोबर नंतर पाण्याच्या आवर्तनाबाबत विचार करण्यात येईल. अंजनी प्रकल्पातील सोनबर्डी गावाच्या बाधितांच्या पुनर्वसनाचा तात्काळ प्रस्ताव तयार करण्यात यावा. अशा सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिल्या.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विविध विभागांच्या आपत्ती सौम्यीकरण प्रस्तांवांचा ही आढावा घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, आपत्ती सौम्यीकरणाचे कामांचा प्रस्ताव तयार करतांना कामांची प्राथमिकता ठरवून प्रस्ताव तयार करावा.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतींना अत्याधुनिक आपदा किट, गावातील तरूणांना आपदा प्रशिक्षण देण्याचा विचार आहे‌. दहा ते पंधरा ग्रामपंचायत मिळून एका मोठ्या ग्रामपंचायतीसाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा विकसित करण्याचा ही विचार आहे. त्याचबरोबर कोणत्या ही नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणारे सुसज्ज यंत्रणा असावी यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचा स्वतःची सॅटॅलाइट यंत्रणा विकसित करण्याचा विचार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती ही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.‌ यावेळी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार डॉ.प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.