…तर १५०० रुपये कायमचे बंद होणार! लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरेंच मोठं वक्तव्य

एप्रिल 10, 2026 2:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेत ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र ई-केवायसी प्रक्रियेनंतर नेमकी पुढील कार्यवाही काय होणार? कोणाचा लाभ बंद होणार? कधीपासून बंद होणार? याबाबत राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे.

ladki bahin yojana

रायगड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२५ पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर, ३१ मार्च आणि आता ३० एप्रिलपर्यंत दुरुस्तीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अनेक महिलांना प्रक्रिया करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या सूचना आणि तक्रारी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की निकषात न बसणाऱ्या महिला किंवा ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांचा दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे पात्र महिलांनी दिलेल्या मुदतीत माहितीची पडताळणी करून दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल अखेरपर्यंत ई-केवायसीमध्ये आवश्यक बदल आणि अपडेट करण्याची हीच अंतिम संधी असण्याची शक्यता आहे. यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.

मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
राज्य सरकारकडून फेब्रुवारी २०२६ चा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मार्चचा १५०० रुपयांचा हप्ता एप्रिल अखेरीस मिळणार की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात एकत्र ३००० रुपये जमा होणार, याबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now