⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महागाईचा आणखी एक झटका ; दूध दरात पुन्हा वाढ, आजपासून नवे दर लागू

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सलग तीन वेळा गाई आणि म्हशीच्या (Milk Price) दूध दरात वाढ करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाने आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात आज १ जूनपासून २ रुपयांची वाढ केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांना मिळणारी किमतीतील सवलत संपुष्टात आली असून कायद्यातील कमाल किरकोळ किमतीबाबतच्या तरतुदीमुळे हा निर्णय घेतल्याचे दूध संघाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील ग्राहकांपेक्षा दोन रुपये कमी किमतीत दूध उपलब्ध केले हाेते. मात्र, एकाच वस्तूची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकत नाही, अशी तरतूद कायद्यात आहे.

त्यामुळे बुधवारपासून ही किंमत वाढत आहे. पण ती अन्य प्रतिस्पर्धी उत्पादक कंपन्यांपेक्षा जास्त झालेली नाही, असेही संघाच्या वतीने सांगण्यात आले. संघाने उत्पादकांना चार महिन्यांपूर्वी खरेदीचे दर वाढवून दिले. त्यामुळे विक्री दरातही वाढ केली. त्यानंतर दुसरी दरवाढ उत्पादन खर्चात वाढ झाल्याने करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले हाेते.