जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२५ । गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. यात अडीच लाखापर्यंत उपन्न असलेल्या पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात दिले जात आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय.

लाडक्या बहिणींच्या पैशांवर चक्क लाडक्या भावांनी डल्ला मारला असून जवळपास १४२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांच्या खात्यात दर महिन्याला पैसे जमा केले जायचे. यामुळे सरकारने कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, महिलांसाठी असलेल्या या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला, असा प्रश्न सध्या विचारण्यात येते आहे. याला जबाबदार कोण, असे प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे
आतापर्यंत या पुरुषांनी चक्क दहा महिने या योजनेचा लाभ घेतला आहे. दहा महिने प्रत्येकी १५०० रुपये या पुरुषांच्या अकाउंटमध्ये जमा केले जायचे. या पुरुषांना २१,४४ कोटी रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता लाडक्या भावांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे.
ऑगस्ट २०२४ पासून या महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. ऑगस्ट ते जून असे १० महिने पुरुषांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. दहा महिने हे पुरुष योजनेचा लाभ घेत आहे, हे प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत डेट्याची पडताळणी केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.












