जळगाव लाईव्ह न्यूज । शासकीय जागेवर अतिक्रमण करणे सरपंच यांना चांगलेच भावले असून याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील दोनगाव बु. येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच संगीताबाई लोटन पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

आधीचे सरपंच जात वैधता प्रमाणपत्र अभावी अपात्र झाले होते. त्यांच्या जागी उपसरपंच संगीताबाई पाटील या प्रभारी सरपंचपदी यांची नियुक्ती केली होती. त्यांनी शासकीय व सार्वजनिक जागेवर विनापरवानगी बेकायदेशीर अतिक्रमण केले म्हणून अपात्र ठरवण्यात यावे याबाबत अपील अर्ज संदीप आसाराम पाटील यांनी नाशिकचे अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केला होता.

त्यानंतर संदीप पाटील व सरपंच या दोन्ही पक्षकारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. यात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत असल्याने संगीताबाई पाटील यांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय देण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी अॅड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.












