⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

वढोदा वनक्षेत्राचे अभयारण्यात रुपांतरसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जिल्ह्यातील जळगाव वनक्षेत्रात येणाऱ्या मुक्ताई भवानी वनक्षेत्राचे अभयारण्य करण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही सकारात्मकता दर्शविली असून, ग्रामस्थांच्या शेतीवर, पाणवठ्यांवर व गावाच्या हक्कांवर कोणतीही बाधा येणार नसल्यास मुक्ताई-भवानी अभयारण्य तयार करण्यात यावे, अशीच अपेक्षा या वनक्षेत्रात येणाऱ्या विविध ग्रामस्थांनी शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या सदस्यांकडे व्यक्त केली आहे.

बुधवारी मुक्ताई भवानी अभयारण्याच्या दर्जासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती सदस्यांकडून बुधवारी मुक्ताई भवानी वनक्षेत्रातील डोलारखेडा या भागातील वनक्षेत्रात समितीच्या सदस्यांनी पाहणी केली. या समितीमध्ये विश्वास काटदरे, रविदास इंगळे, राजेंद्र नन्नवरे, किशोर रिठे, राजेंद्र ठोंबरे, रवींद्र फालक, विवेक देसाई, वनसंरक्षक डी.डब्ल्यू पवार, अभय उजागरे, रोहिदास दगडे यांचा समावेश होता. समिती सदस्यांनी पाहणी केल्यानंतर कुन्हा येथे जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मुक्ताई भवानी वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा हवा की नाही? याबाबत नागरिकांची भूमिका समिती सदस्यांनी जाणून घेतली.

या कार्यक्रमात परिसरातील विविध गावांमधील सरपंच, उपसरपंच, वन समितीचे सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी अभयारण्याच्या दर्जासाठी हमी दिली आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये झाली होती घोषणा

वढोदा मुक्ताईनगर वनक्षेत्रात साधारणतः आठ वर्षांपूर्वी वढोदा (मुक्ताईनगर) वनक्षेत्रात वाघाचे अस्तित्व आढळून आल्यानंतर सातपुडा बचाव समितीने या वनक्षेत्राचा व्याघ्र संवर्धन प्रकल्प करावा, अशी मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये मुक्ताईनगरच्या सभेत मुक्काई-भवानी वनक्षेत्राला अभ्यारण्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही प्रक्रिया थंडबस्त्यात गेली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी याबायत समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीच्या सदस्यांनी या वनक्षेत्रात पाहणी केली आहे.

समितीच्या सदस्यांनी या वनक्षेत्रात वाघांच्या अस्तित्वाची माहिती घेतली असून, या भागात वाघांचा अधिवास केव्हापासून आहे? इतर प्राण्यांची संख्या, शिकारीला पुरक स्थिती, वनक्षेत्र, वनजमिनींचा प्रश्न याबाबतचा संपुर्ण अहवाल समितीकडून तयार केला जाणार आहे. अहवाल तयार झाल्यानंतर समितीकडून आपला अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यकडे सादर केला जाणार आहे.

वढोदा व्याघ्र संवर्धन प्रकल्प

वढोदा व्याघ्र संवर्धन प्रकल्प १२२.७४ चौ. कि.मी. असून त्यात मुक्काई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून अधिसूचना काढण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अनुषंगाने काही विशिष्ट क्षेत्र प्रतिबंधित होणार आहे. तापी-पूर्णा या नद्यांनी वेढलेला आणि कुंद धरण, भवानीतलाव, भाटी तलाव, शिया तलाव असे जलस्त्रोत या क्षेत्रात असल्याने या भागात असलेले समृध्द असे वन्यजीव विकसित झाले आहे. पूर्वेला अंबाबरुवा अभयारण्य असून पुढे हे क्षेत्र मेळघाट अभयारण्याला जोडले जाते. उत्तरेला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर वनक्षेत्र आहे. पश्चिमेस रावेर वनक्षेत्रमार्गे यावल अभयारण्याशी जोडले जाते. तर दक्षिणेस मुकाईनगर-बोदवड-जामनेर वनक्षेत्रमार्गे गौताळा अभयारण्याशी जोडले जाते.

हे देखील वाचा :