जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात २३ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत आलेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने उद्या (दि. १० जून) सकाळी ११ वाजता मंत्रालयातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विषय मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत उद्याच कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा व आवश्यक निर्णय प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश दिले.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, चोपडा यांच्यासह विविध तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून हजारो एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त झाले आहे. २३ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागणीमुळे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, पीक विमा, नुकसानभरपाई, पंचनामे, विमा दाव्यांची पूर्तता आणि तातडीच्या मदतीबाबत सखोल चर्चा होणार आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या बैठकीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राज्य शासनाच्या सर्वोच्च पातळीवर प्राधान्य मिळाल्याचे मानले जात आहे.








