⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Jalgaon Politics : १४ महिन्यात महापौरांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले पण ८ वर्षापासून आमदार ‘कुल’!

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरात गेल्या १४ महिन्यांपासून महापौर म्हणून जयश्री महाजन (Mayor Jayashri Mahajan) या कार्यभार पाहत आहेत. जळगाव शहरात शिवसेनेची सत्ता आली तरी जळगाव शहरातील रस्ते, खड्डे दुरुस्ती अदयाप झालेली नाही. शहरातील विकासकामे खोळंबली असल्याने महापौरांनी वारंवार प्रशासनाला विचारणा केली. रस्त्यावर नागरिक जाब विचारत असून त्यांना उत्तर देखील देऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे महापौरांनी सांगितले. महापौर वारंवार संताप करीत असून तरीही कामे मार्गी लागत नाही. जळगाव शहराचा विकास करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या शिबिरात महापौरांचा रक्तदाब मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी तपासाला. महापौर संताप करीत असल्याने त्यांचा रक्तदाब वाढू शकतो हे निश्चित आहे मात्र जळगावचे आ.राजुमामा भोळे (MLA Suresh Bhole) मात्र स्वतःची ‘कूल’ इमेज कायम ठेवून आहेत. आमदार कधी संताप करणार आणि अधिकारी, मक्तेदार कामाला लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Mayor’s ‘blood pressure’ increased in 14 months, but since 8 years MLA ‘Cool’!

जळगाव शहराचा विकास तसा अनेक वर्षापासून खुंटलेलाच आहे. जळगावचा विस्तार दिवसेंदिवस होत असला तरी विकास मात्र हवा तसा होत नाही. जळगावातील रस्त्यांची तर फार दुरवस्था झाली आहे. अमृत योजना आणि भूमिगत गटारीचे खड्डे बुजले जात नाही त्यात नवीन रस्ते तयार होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. खड्ड्यातून वाट काढणे जिकरीचे होऊन बसले असून निधी असून खर्च करण्यात अडचणी येत आहेत. भाजप सरकारच्या काळात १०० कोटींसह मोठ्याप्रमाणात निधी जळगाव शहरासाठी मिळाला. आ.सुरेश भोळे यांनी त्याचे श्रेय देखील घेतले आणि विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना किती निधी आणला ते देखील सांगितले. निधी तर आला परंतु त्यातून कोणती कामे झाली आणि नागरिकांचा कसा फायदा झाला हे मात्र दिसले नाही.

काही दिवसापूर्वी भाजप (BJP Maharashtra) महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी, आ.सुरेश भोळे यांची बाजू घेत महापौरांवर निशाणा साधला होता. आ.राजूमामा भोळे यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी २०१४ ते २०२२ पर्यंत अनेक कोटी रुपयांचे कामे केले आहेत. सर्वप्रथम यामध्ये आपली मनपामध्ये सत्ता असताना जे.डी.सी.सी बँक हुडकोचे कर्ज कोणी फेडले? छ.शिवाजीनगर व पिंप्राळा उड्डाण पुलासाठी निधी कोणी दिला? शहरातल्या मेहरूण तलाव विकास व सुशोभीकरणासाठी ५ कोटीचा निधी कुठून आला? असे प्रश्न उपस्थित करून आ.भोळे यांनी युती सरकारच्या काळात १०० कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आणि आता त्यात शहरात ४२ कोटीचे कामे सुरु होणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. सूर्यवंशीच नव्हे तर स्वतः आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी वारंवार निधीचा उल्लेख केला खरा पण त्यातून प्रत्यक्षात कामे झाली का? हा प्रश्न आजही कायम आहे. निधीचे नियोजन चुकले हाच आरोप आजवर ऐकायला येत आहे.
हे देखील वाचा : अजब गजब : मनपा आयुक्त मॅडमांनी तपासले महापौरांचे ‘ब्लडप्रेशर’!

जळगाव शहर मनपात असलेली भाजपची सत्ता उलथवून टाकत शिवसेनेने आपला भगवा फडकावला. शिवसेनेची राज्यात आणि जळगावात सत्ता असल्याने शहराचा विकास होणार असे वाटू लागले होते मात्र झाले काही वेगळंच. शहरातील थोडेफार रस्ते आणि विकासकामाला सुरुवात देखील झाली परंतु हवा तसा विकास होऊ शकला नाही. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी योग्य वेळी सर्वांशी चर्चा करून मार्ग काढला असता तर आज काहीतरी विकास दिसून आला असता. जळगाव शहरात विकासकामे रखडल्याने महापौर जयश्री महाजन यांनी वारंवार नाराजी बोलून दाखवली. शहराच्या विकासासाठी महापौर दाखवीत असलेली तळमळ कौतुकास्पद आहे परंतु कामाचं होत नसतील तर त्यांचा संताप देखील रास्त आहे.

गेल्या महासभेत दि.७ जुलै रोजी महापौर जयश्री महाजन यांनी संताप व्यक्त करीत, वारंवार सूचना देऊन देखील कामे होत नाही. खड्डे आणि चिखलमुळे नागरिकांचे हाल होत असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नागरिक आम्हाला प्रश्न विचारत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नसल्याने आम्हाला मान खाली घालण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या प्रश्नांची जाण ठेवून, किमान रस्त्यांची कामे करा अशा शब्दात महापौरांनी मनपा आयुक्तांसह मनपा अधिकाऱ्यांनाही खडेबोल सुनावले आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन देखील शहरातील रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने महापौरांसह सर्वच नगरसेवकांना नागरिकांची बोलणी खावी लागत आहेत. काही दिवसापूर्वी इच्छादेवी ते डी मार्ट रस्त्यावर एक ट्रॅक्टर उलटले होते त्यानंतर एका रिक्षा चालकाने महापौरांना सुनावले होते.

शहरात विकासकामे होत नसल्याने महापौर वारंवार संताप करीत असून अवघ्या चौदा महिन्यात महापौरांचा किती वेळा रक्तदाब वाढला असेल हे सांगणे कठीण आहे. बऱ्याचदा तर आजारी असून देखील महापौरांनी कामकाज पहिले आहे. दिवसभर दालनात नागरिकांशी चर्चा करीत त्यांच्या समस्यांचे समाधान करण्याचा महापौर जयश्री महाजन प्रयत्न करतात. अनेकदा कामे होत नसल्याने अधिकाऱ्यांवर देखील चिडतात. दोन दिवसांपूर्वी मनपात झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी महापौर जयश्री महाजनांचा रक्तदाब तपासला होता. महापौर चिडतात, संताप करतात, त्यामुळे आरोग्य धोक्यात येते हे खरे असले तरी शहराचे आ.सुरेश भोळे कितपत लक्ष देतात हा मोठा प्रश्न आहे.
हे देखील वाचा : जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी निधी द्या – आ.राजूमामा भोळे

शांत, संयमी आणि वेळप्रसंगी मदतीला धावून येणारे आमदार म्हणून राजूमामा भोळे यांनी स्वतःची छवी तयार केली असली तरी शहर विकासासाठी ती काही कामाची नाही. गेल्या वर्षी भाजपात पडलेल्या फूटनंतर ते दिसून आले होते. भाजपच्या नगरसेवकांनी आ.भोळे यांच्यावरच आरोप केले होते. शहराचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर महापौरांसह आमदार आणि खासदार देखील खमके असणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना धारेवर धरून आणि सहकारी सदस्यांना सूचना देत आ.भोळे यांनी त्या काळात विकास साधला असता तर आज चित्र काही वेगळे असते. आ.राजुमामा भोळे अचानक कधीतरी शहरात ऍक्टिव्ह होतात आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतात एरव्ही भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष असल्याने जळगाव शहराबाहेरच त्यांची भ्रमंती असते.

शांत, संयमी भूमिका ठेवून असलेले आ.राजूमामा भोळे आज देखील कुल आहेत. राज्यात आता पुन्हा भाजपची सत्ता आली असून गेल्या काळातील बॅकलॉग ते भरून काढतात कि यापुढे देखील शांत भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्यचे ठरेल. आमदार जोवर आक्रमक होणार नाही अधिकारी, कर्मचारी वर्ग त्यांना गृहीत धरेल. जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार असल्याने शहराच्या विकासाची जबाबदारी आमदारांचीच आहे. आमदार जेव्हा शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतील तेव्हाच निधीचे योग्य नियोजन होऊन विकासकामे दिसू लागतील. महापौरांसोबतच मनपातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधत आमदारांनी शहर विकासाकडे आज लक्ष देणे आवश्यक आहे.