जळगावात ५ एप्रिल रोजी ’विशाल हिंदू मेळाव्या’चे आयोजन

एप्रिल 4, 2026 3:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र आणून सामाजिक समरसता व एकात्मता वाढविण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘काशी विश्वनाथ हिंदू एकता संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. नवनाथ नगर परिसरातील विविध सोसायट्यांच्या वतीने तसेच सकल हिंदू समाज यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

New Project 5

हा मेळावा सायंकाळी ठीक ६ वाजता काशी विश्वनाथ बाबा महादेव मंदिर, सिद्धिविनायक चौक, जळगाव येथे होणार आहे. या संमेलनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, हिंदू समाजातील एकता, समरसता आणि संस्कृतीचे जतन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव शहर कार्यवाह श्री. विजय धनराज ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणातून हिंदू समाजातील एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहित यावर सखोल विचार मांडले जाणार आहेत.

तसेच या संमेलनाला ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज खलाणे यांचे आशीर्वचन लाभणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून धर्म, अध्यात्म आणि संस्कार यांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले जाणार आहे.

सध्याच्या काळात समाजात वाढणारे मतभेद आणि विखुरलेपण दूर करून हिंदू समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी सांगितले. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहित जपण्यासाठी समाजाने एकत्र येऊन सकारात्मक कार्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या संमेलनाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये बंधुभाव वाढवणे, सामाजिक एकात्मता निर्माण करणे आणि आपल्या परंपरा व संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात येणार आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू एकतेचा संदेश बळकट करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now