जळगावात अवकाळी पावसाची विश्रांती ; आता उन्हाचा चटका वाढणार, वाचा हवामान अंदाज?

एप्रिल 6, 2026 10:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२६ । गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तर या पावसामुळे तापमानात घट झाल्यानं जळगावकरांना उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळाला होता. दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असून, आता जळगावकरांना खऱ्या अर्थाने कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत वातावरण कोरडे होऊन तापमानात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

tapman 2

गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान ३५ ते ३६ अंशांवर स्थिर होते. या पावसामुळे मागील आठवड्यात जळगावात उन्हाचा चटका कमी झाला असून, गारवा वाढलेला होता. मात्र, आता पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागल्याने तापमानात झपाट्याने वाढ होणार आहे.

काल रविवारी जळगावचे कमाल तापमान ३५.५ अंश तर किमान तापमान २१.४ इतके होते. दिवसा काहीसा उकाडा चटका जाणवत असला तरी रात्री आणि पहाटेच्या गारव्याने जळगावकरांना दिलासा मिळत आहे. मात्र, पुढील आठवड्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे.

पुढील आठवड्यात जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, १२ ते १३ एप्रिलनंतर जिल्ह्यात खऱ्या उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागेल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाचे दोन टप्पे अनुभवायला मिळाले आहेत. एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नसली, तरी ती अत्यंत कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories