जळगावातील बोगस केळी विमा प्रकरणाने घेतले गंभीर वळण; शेतकऱ्यांवर कारवाईसाठी कृषी विभागाचे मोठे पाऊल?

एप्रिल 6, 2026 3:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस केळी पीकविमा प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून खुलासे न सादर करणाऱ्या तब्बल २४ हजार शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी कृषी विभाग मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. लागवड नसतानाही विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

banana

प्राथमिक चौकशीत जिल्ह्यात सुमारे ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर कागदोपत्री केळी बागा दाखवण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात २७ हजारांहून अधिक शेतकरी आणि ४८ सीएससी केंद्र चालकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शासनाची फसवणूक करण्यासाठी संगनमताने हा प्रकार घडल्याचा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे.

दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांना खुलासा सादर करण्यासाठी दोन वेळा मुदत देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने केवळ ३ हजार खातेधारकांनीच आपले म्हणणे मांडले आहे, तर उर्वरित सुमारे २४ हजार शेतकऱ्यांनी नोटिशीकडे दुर्लक्ष केले आहे.

यामुळे आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now