जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असून यातच आगीच्या घटना समोर येत आहे. अशातच जळगावच्या पोलीस मुख्यालयातील स्टोअर रूमला आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये खोलीतील साहित्य, कागदपत्रे, तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन बंबाने आग नियंत्रणात आणली. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?
पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या ज्या खोलीत स्टेशनरी, पोलिसांच्या बंदोबस्तासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात, त्या खोलीतून आज अचानक धूर निघू लागला. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण खोलीला विळखा घातला. या आगीत खोलीत ठेवलेले कागदपत्रे, स्टेशनरी आणि इतर साहित्याचे जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस प्रशासन आता या घटनेचा सविस्तर पंचनामा करत असून नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणे बाकी आहे.








