जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२३ । महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आरोपींना कसले भयच राहिले नसल्याचे दिसून येतेय. अशातच जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

मुलाला नोकरी लावून देण्याचं आमिष देऊन एकाने विवाहितेसोबत जवळीक साधत तिच्या मर्जीविरुध्द वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तब्बल एक वर्षांपासून हा प्रकार घडला असून अखेर महिलेने याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील एका भागात विवाहिता तिच्या कुटुंबियासह वास्तव्यास आहे. एकाने विवाहितेला तिच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सांगितले, या बदल्यात त्या व्यक्तीने विवाहितेकडून अडीच लाख रुपये तसेच १५ ग्रॅमचे सोन्याचे दागिणे सुध्दा घेतले. याचदरम्यान त्या व्यक्तीने विवाहितेसोबतजवळीक साधत तिच्या मर्जीविरुध्द वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
हा प्रकार जर कुणाला सांगितला तर मुलाला नोकरी लावून देणार नाही, अशी धमकीही विनोद तायडे याने विवाहितेला दिली. १ मे २०२२ ते १ मे २०२३ दरम्यान हा सर्व प्रकार घडला. अखेर या त्रासाला कंटाळून तब्बल एक वर्षानंतर विवाहितेने मंगळवार, २ मे २०२३ रोजी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.









