मोठी बातमी : सीबीआय पथकाने नोंदविले सुनील झंवर, ललवाणी यांचे जबाब

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून अ‍ॅड.विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावल्या प्रकरणी विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कथित गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात शुक्रवारपासून केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)चे पथक जळगावात आले आहे. सोमवारी सीबीआय पथकाने सुनील झंवर, पारस ललवाणी यांच्यासह आणखी काही जणांचे जबाब नोंदविले.

सन २०१८ मध्ये अ‍ॅड.विजय पाटील यांना पुण्यात बोलवून डांबून ठेवत धमकावल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालांतराने हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे तपासाला देण्यात आला होता. शुक्रवारी याच गुन्ह्याशी निगडीत चौकशीसाठी जळगावात सीबीआयचे पथक जळगावात दाखल झाले होते. पथक शनिवारी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयाची पाहणी केली, हाणामारीच्या घटनांची चौकशी केली. तत्कालीन संचालक गोकुळ पिंताबर पाटील, परमानंद साठे, विरेंद्र भोईटे, महेंद्र भोईटे, शिवाजी भोईटे, जयवंतराव येवले, जयवंतराव देशमुख आदींचे जबाब घेतले होते.

फिर्यादी विजय पाटील यांनी या गुन्ह्यात मंत्री गिरीष महाजन यांचाही सहभाग असल्याचे अनेकवेळा माध्यमांना सांगीतले होते. महाजन यांच्या सांगण्याप्रमाणेच नीलेश भोईटेसह भोईटे गटाने आपल्याला डांबले, धमक्या दिल्या, मारहाण केली, असा आरोप पाटील यांनी काही पत्रकार परिषदांमध्ये केला होता. अ‍ॅड.विजय पाटील यांना डांबून ठेवण्यात आलेला पुण्यातील फ्लॅट सुनील झंवर यांच्या मालकीचा असल्याने त्यांचा देखील सोमवारी सीबीआय पथकाने जबाब नोंदविला. झंवर यांच्यासोबत पथकाने जामनेर येथील पारस ललवाणी व जळगावातील २-३ राजकारणी लोकांचे जाबजबाब नोंदविले.