⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

चितोडा खून प्रकरण : मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात, लवकरच गजाआड होणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । यावल (Yawal) तालुक्यातील चितोडा (Chitoda) येथील मनोज संतोष भंगाळे (३८) (Manoj Bhangale) या तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना सांगवी फाटा ते डोंगर कठोरा रस्त्यावर आज सोमवारी पहाटे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही हत्या कोणी व कशासाठी केली? याबाबतचे कारण अद्यापही समोर आले नसले तरी मारेकरी लवकरच गजाआड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील सांगवी बुद्रुक शिवारातील चंद्रकांत निंबा चौधरी यांच्या शेतात आज पहाटे आढळून आला. मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. मृतदेहावर पोटावर तसेच मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले असून मृतदेह पालथ्या अवस्थेत होता. मनोज भंगाळे यांची मोटर सायकल (क्रमांक एमएच १९डी आर ९५९८) मृतदेहापासून पाच-सहा फुटाचे अंतरावर मिळून आली आहे.

दरम्यान, काल रविवारी रात्री मनोज भंगाळे यांनी जेवण करून आपली मोटर सायकलवरून आपण बाहेर जात असल्याचे कुटुंबियांनी सांगितली. मात्र सकाळ होऊनही मनोज हा घरी न आल्याने घरचे चिंतेत होते. अशातच आज सोमवारी सकाळी चंद्रकांत चौधरी यांच्या शेतात शेतकर्‍यास मनोज भंगाळे यांचा मृतदेह दिसल्यानंतर घटनेची खबर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पहाटेची ही खबर वार्‍यासारखी गावासह परिसर पसरल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, फौजदार विनोद खांडबहाले सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. ठसेतज्ज्ञांनी परिसरातून पुरावे जमा केलेत. तर श्‍वान पथकाने या खुनाचा काही सुगावा मिळतो का? याची पाहणी केली. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तसेच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी निष्पन्न केले असून त्यांची झाडाझडती सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच पोलीस त्यांना गजाआड करतील अशी शक्यता आहे. याबाबत पोलीस प्रशासन लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.