जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारमधील अजित पवार गटाचे नेते आणि क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने धक्का दिला आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवली. त्यामुळे त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची न्यायालयाने सुनावली होती.

मात्र त्यावेळी निकालानंतर काही तासात त्यांना जामीन मंजूर झाल्याने व शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांचे मंत्रीपद वाचले होते. न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली होती. मात्र याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.
त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. तसेच या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपदही धोक्यात आलं आहे. या प्रकरणी जामिनासाठी आता माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.












