⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मानव निर्मित प्रदुषण ही वसुंधरेची कधीही न भरून येणारी जखम; डॉ.काबरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा माेठ्या प्रमाणात ऱ्हास हाेताेय. वसुंधरेचे जतन हे आपणच करणे गरजेचे आहे. अग्नी, इंधन यांचा वापर आपण टाळला तरच भविष्यात आपल्याला वसुंधरा चांगली दिसेल. वृक्षारोपण करून फक्त पर्यावर्णाचे रक्षण होत नाही तर योग्यप्रकारे वृक्षारोपण होऊन त्यांचे जतन हाेणे आवश्यक आहे. पर्यावरण वाचवायचे असेल तर पर्यावरण पुरक जीवनशैलीचा अवलंब करायला हवा. मानव निर्मित प्रदुषण ही वसुंधरेची कधीही न भरून येणारी जखम आहे. यासाठीच हरा भरा भारत या वैश्विक अभियानाची सुरुवात आणि फ्रुट बँकची देखील सुरुवात आजच्या वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यकारी संघ व डाॅ. एन.एम.काबरा फाउंडेशनतर्फे करण्यात येत असल्याची माहिती शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत डाॅ. महेंद्र काबरा यांनी दिली. 

यावेळी डाॅ. काबरा म्हणाले की, अग्नी, इंधन वीज यांचा वापर आपण प्रत्येकाने टाळायला हवा. दरराेज ची आपली दिनचर्याच अशी बनवा की त्यामुळे काेणत्याही प्रकारचा पर्यावरणाचा ऱ्हास हाेणार नाही. जसे की फळ झाडे लावा, प्रत्येक माणसाच्या मागे पाच फळ झाडे लावली गेली पाहिजे. जेणेकरुन भविष्यात जगात आता अनेक ठीकाणी जी भुकमारी हाेत आहे ती राहणार नाही. या फळांची बीजे हे आपण प्रत्येकाने लावावी. जेणेकरुन येणाऱ्या काळात प्रत्येकाला माेफत फळे मिळतील. तसेच आपण प्रत्येक व्यायाम करताे पण आपला व्यायाम हा विधायक असायला हवा. विधायक व्यायामाकडे भर देणे आवश्यक आहे. जसे झाडे लावणे, कंपाेस्ट खतांसाठी खड्डे खाेदणे , झाडांना पाणी देणे हे सगळे व्यायाम म्हणून करावे श्रमदानाने आपण पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अवलंब करु शकताे. मग यात सायकल चा व्यायाम म्हणून नाही तर ऑफीस जाताना वापर करावा, मशीनचे वापर टाळावे आणि विशेष म्हणजे साधेपणा अंगीकारावा. जेवढे साधी राहणीमान तेवढेच तुमचे विचारही माेठे हाेतात. जसे आहार तसा विचार त्यामुळे जसे शिजलेले अन्न आपण खायला हवे यासारख्या गाेष्टींचा आजपासून आपण संकल्प करायला हवा. हरा भरा भारत या अंतर्गत यासाठी नागरीकांना आम्ही प्राेत्साहन करुन जनजागृती करणार आहाेत. या पुर्वी देखील काबरा फाउंडेशनतर्फे अनेक उपक्रम पर्यावरणासाठी हाती घेण्यात आले हाेते. 

नागरीकांना आवश्यक असल्यास आम्ही फळांची बीज देखील देणार आहाेत. यासाठी फ्रुट सीड बँक तयार करुन त्यामध्ये अनेक प्रकारच्या फळांच्या बीया असतील ज्यांना काेणाला ते हवे असतील त्यांना आम्ही ती देणार आहाेत. तर फक्त जिल्ह्यापुरता नाही तर वैश्विक अभियान हे सुरु करीत असून या अभियानाशी जुळलेला प्रत्येक व्यक्ती हा विविध माध्यमातून जनजागृती करणार आहे. तसेच पर्यावरण पुरक जीवनशैली नागरीकांनी आता कशी आत्मसात करावी याबाबत मार्गदर्शनातून संदेश देण्यात येणार असल्याचेही डाॅ. महेंद्र काबरा यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. 

यावेळी डाॅ. ममता काबरा, दिलीप काेल्हे, प्रा. बी.एन.बाहेती, जितेंद्र हेडाऊ, अनिता भाेई, ललित बडगुजर, अनिल जाजू, रवि नेटके, उज्वला पाेतदार यांची उपस्थिती हाेती.