मकर संक्राती-भोगी हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२३ । संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, 2023 म्हणून घोषित केले आहे. या वर्षाच्या निमित्ताने मकर संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून कृषि विभागामार्फत राज्यात साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांपर्यत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती येणार आहे.

या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यक त्यांचेकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहारतज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.