Yawal: मीटरमध्ये छेडछाड, यावलमधील ‘या’ गावातील महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात..
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२५ । राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणकडून ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात असून या मोहिमेअंतर्गत यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावांमध्ये मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे निदर्शनास आल्यामुळे ५० वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतले आहेत. यात काही निष्पन्न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणाकडून शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यानुसार गुरुवारी महावितरणचे पथक यावल तालुक्यातील सांगवी बु- या गावात गेले होते. यामध्ये ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केली आहे; असे संशयीत ५० मीटर तपासणीसाठी काढण्यात आले.
डिजिटल मीटर बसविणार
महावितरणकडून विविध चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावल तालुक्यात पथक पोहचून सांगवी गावात करण्यात आली असून लवकरच इतर गावांमध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने डिजिटल मीटर बसून जुने मीटर काढण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. वीजचोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सांगवी बुद्रुक गावातील ५० घरांमधील मीटर हे तपासणी कामी काढण्यात आले आहे. मीटर मध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे.
.. तर दंड आकारला जाणार
महावितरणने ताब्यात घेतलेल्या मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी केली जाणार आहे. तर आता नागरिकांच्या घरात पूर्वीचे जुने मीटर एवजी नवीन स्मार्ट डिजिटल मीटर लावले जाणार आहेत. अशा संशयीत मीटर मधील तफावत व संबंधितांनी चोरी केलेलील असल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे. यात काही आढळून आल्यास वीज युनिट नुसार त्यांना दंडाची नोटीस दिली जाणार असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.